spot_img
spot_img
spot_img

रुपीनगरमध्ये तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; चौघांवर गुन्हा

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

तळवडे : ‘मला ओळख का देत नाहीस?’ असे म्हणत एका १९ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून दुकानाबाहेर बोलावून घेत लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना रुपीनगर येथे घडली. याप्रकरणी मनमीत सिंग याच्यासह त्याच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत सचिन वाकळे (वय १९, रा. यमुनानगर, निगडी) हे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास रुपीनगर भाजी मंडई परिसरातील रॉयल मेन्स वेअर दुकानात कपडे खरेदीसाठी गेले होते. त्यावेळी मनमीत सिंग याने ‘तू मला ओळख का देत नाहीस?’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वाकळे यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केल्यानंतर आरोपी बाहेर गेला आणि तीन साथीदारांना घेऊन आला. चौघांनी वाकळे यांना दुकानाबाहेर बोलावून मारहाण सुरू केली. यावेळी नागरिक भांडण सोडविण्यासाठी पुढे येत असताना मनमीत सिंग याने लोखंडी रॉड हवेत फिरवत ‘मी या भागातील भाई आहे; मध्ये कोणी आले तर कोणालाही सोडणार नाही,’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली.

त्यानंतर वाकळे यांच्या डोक्यात, दोन्ही हातांवर व पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. अन्य तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चौघेही पसार झाले.

याप्रकरणी २३ ऑगस्ट रोजी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!