spot_img
spot_img
spot_img

लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसला; अंगठी लंपास करून साधू फरार

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसलेल्या एका कथित साधूने चालकाचा विश्वास संपादन करून सोन्याची अंगठी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. मोरवाडी ते पूर्णानगरदरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत रामचंद्र पाटील (वय ४९) हे २२ ऑगस्ट रोजी रात्री कारने जात असताना एका अनोळखी साधूने लिफ्ट मागितली. कारमध्ये बसल्यानंतर त्याने आपण ‘नागा साधू’ असल्याचे सांगत आशीर्वादामुळे सुख-समृद्धी मिळेल, असा दावा करून पाटील यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर त्याने पाटील यांच्या हातातील सोन्याची अंगठी काढून घेण्यास भाग पाडले. अंगठी डोळ्याला लावून ती कारच्या गिअरजवळ ठेवत असल्याचे भासवून त्याने ती स्वतःजवळ ठेवली आणि पाटील यांची फसवणूक केली.

या प्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ व ३१८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचे वय व ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. तो अंगाने जाड, सुमारे साडेपाच फूट उंच, सावळ्या रंगाचा असून भगवे वस्त्र, डोक्यावर फेटा आणि हातात मोठे कडे घातलेले होते. तो हिंदी भाषेत बोलत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!