पिंपरी-चिंचवड:पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात वास्तव्यास असलेल्या खानदेशवासीयांसाठी संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सणाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत अखंडितपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित तिसऱ्या ‘भव्य खान्देश सार्वजनिक कानबाई माता उत्सव २०२६’ च्या अंतर्गत आज अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात आगमन मिरवणूक व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
या महोत्सवाच्या प्रास्ताविकात संयोजन समितीचे प्रमुख नामदेव ढाके यांनी उपस्थितांचे स्वागत करून महोत्सवाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
गावाकडून शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कानबाई महोत्सव साजरा होत असल्याबद्दल उपस्थितांनी मनमोकळा आनंद व्यक्त केला. आज पार पडलेल्या कानबाई उत्सवाच्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण पिंपरी-चिंचवड नगरीत आनंदाचे व भक्तीमय वातावरण निर्माण केले होते.
कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, पुणे-पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासात खान्देशी लोकांचा मोठा हातभार आहे. एवढ्या दूर राहूनही आपल्या मातीची संस्कृती आणि परंपरा येथील खानदेशवासीयांनी अत्यंत उत्साहात कायम राखल्याचा आणि देश-विदेशातही हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
आज, रविवार (२३ ऑगस्ट) रोजी दुपारी तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड येथून शुभम गार्डन, वाल्हेकरवाडीपर्यंत कानबाई माता आगमन भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिरपूरची प्रसिद्ध ‘गोल्डन बँड’ आणि अमळनेरची ‘राधेकृष्णा बँड’ विशेष आकर्षण ठरली. या मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कलश घेऊन तर पुरुषांनी पारंपरिक वेषात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथे देवीची स्थापना, कानबाई माता पूजन आणि उत्सव उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याचवेळी मान्यवरांचा सत्कार व मनोगताचा कार्यक्रम पार पडला. रात्री ८ वाजल्यापासून भाविकांसाठी मातांचे दर्शन व महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला. तसेच रात्री ८ ते १० या वेळेत खानदेश फ्रेंड सर्कल ग्रुप (शिरपूर, धुळे, पुणे) चे कलाकार तसेच लोकप्रिय गायक सागर देशमुख, दिलीप बाशिंगे, कुणाल महाराज आणि दिनेश बाशिंगे यांच्या उपस्थितीत कानबाई मातेच्या गाण्यांचा भव्य संगीतमय कार्यक्रम रंगला, ज्याने रसिकांची मने जिंकली.
उद्या, सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता शुभम गार्डन ते जाधव घाट, रावेत या मार्गावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि शिरपूरच्या ‘गोल्डेन बँड’च्या प्रमुख उपस्थितीत विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी खान्देश मराठा मंडळ, मराठा पाटील समाज मंडळ, गुजर स्नेह वर्धिनी, केदारेश्वर प्रतिष्ठान, खानदेश तिळवण तेली समाज मंडळ, लेवा पाटीदार समाज मंडळ, खानदेश माळी महासंघ, संतसेना महाराज खान्देश नाभिक मंडळ, भारतीय बहुजन विकास समिती, खानदेश अहिराणी कस्तुरी मंच, आहिरे मराठा मंडळ, बारी समाज मंडळ, सोनार समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, राजपूत समाज मंडळ, महाराणा मित्र मंडळ, कुंभार समाज मंडळ, बडगुजर समाज मंडळ, वंजारी समाज मंडळ, शिंपी समाज मंडळ, खानदेश लाड शाखीय वाणी समाज मंडळ, क्षत्रिय माळी समाज मंडळ, कासार समाज मंडळ, लोहार समाज मंडळ, अखिल टोकरे कोळी समाज मंडळ, सुतार समाज मंडळ आणि कानबाई सेवा फाउंडेशन (खानदेश) यांसह शहरातील सर्व समाजबांधव सहआयोजक म्हणून सक्रिय सहभाग घेत आहेत.





Total Users : 215315