spot_img
spot_img
spot_img

८४ लाखांची गुंतवणूक, परतावा फक्त १९ लाख; ६४.८५ लाखांची फसवणूक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

भोसरी : महिन्याला १० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून तब्बल ८४ लाख ५१ हजार ६८८ रुपये उकळल्याचा प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे. त्यापैकी केवळ १९ लाख ६६ हजार ३४० रुपये परत करून उर्वरित ६४ लाख ८५ हजार ३४८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत गोडाऊन चौक, भोसरी येथील जय गणेश साम्राज्य परिसरातील ग्रो कॅपिटल कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार घडला. आरोपींनी ग्रो कॅपिटल व विश्वांजली व्हेंचर्स एलएलपी या कंपन्यांमध्ये एक लाख रुपये गुंतवल्यास २० महिने दरमहा १० टक्के नफा देण्याचे आमिष दाखविले.

या आमिषाला बळी पडून फिर्यादीसह इतर गुंतवणूकदारांनी ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण ८४ लाख ५१ हजार ६८८ रुपये गुंतवले. मात्र गुंतवणुकीतून १९ लाख ६६ हजार ३४० रुपये परत केल्यानंतर उर्वरित रक्कम परत न करता आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी हडप केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी मनोज अशोक पाटील याच्यासह तीन महिला/पुरुष आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३(५) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ मधील कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार दगडगावे व मसपोनि हर्षदा पाटील करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!