पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
भोसरी : कंपनीच्या डायरेक्टरच्या नावासारखे बनावट आयडी तयार करून मायक्रोसॉफ्ट टीम्स ग्रुपमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत कंपनीच्या खात्यातून तब्बल ३० लाख रुपये परस्पर वळवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार भोसरीत उघडकीस आला आहे.
ही घटना १९ ऑगस्ट रोजी दुपारी १.१० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान बालाजीनगर, टेल्को रोड येथील जी.एन.एस. इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली. कंपनीचे डायरेक्टर संजय पनवार यांच्या नावासारखा ‘Sanjay Panwar’ नावाचा आयडीधारक कंपनीच्या मायक्रोसॉफ्ट टीम्स ग्रुपमध्ये शिरला.
त्यानंतर त्याने ICICI बँकेच्या एका खात्याची माहिती पाठवून कंपनीला तातडीने ३० लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीच्या बँक ऑफ बडोदा खात्यातून ३० लाख रुपये संबंधित खात्यात वर्ग करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गजेंद्र भोरे यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी ‘Sanjay Panwar’ आयडीधारकाविरुद्ध बीएनएस कलम ३१८(४), ३१९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी), ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वपोनि मिसाळ व पोउपनि खडसे करीत आहेत.





Total Users : 215331