spot_img
spot_img
spot_img

एसटी बसचे ब्रेक फेल; उभ्या खासगी बसला धडक, चार प्रवासी जखमी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एसटी बसचे ब्रेक न लागल्याने उभ्या असलेल्या खासगी बसला पाठीमागून जोरदार धडक बसून अपघात झाला. या अपघातात एसटी बसमधील चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. ही घटना चाकण-तळेगाव चौक परिसरातील पुणे-नाशिक मार्गावर घडली.

२१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाल्याची नोंद चाकण उत्तर पोलिस ठाण्यात करण्यात आली. याप्रकरणी एसटी चालक सोपान भारत कानवडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी शांतीलाल जगन्नाथ मोरे हे एसटी बस क्रमांक एमएच १३ सीयू ८४७३ वर ड्युटीवर होते. बस चाकण तळेगाव चौकातून प्रवासी घेऊन पुणे-नाशिक मार्गाने नाशिकच्या दिशेने जात होती. आरती हॉटेलजवळ समोर खासगी बस उभी असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.

वाहतुकीची गर्दी असल्याने एसटी बस रस्त्याच्या डाव्या बाजूने पुढे नेत असताना चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र ब्रेक न लागल्याने एसटी बसने समोर उभ्या असलेल्या खासगी बसला पाठीमागून धडक दिली.

या अपघातात शुभांगी चव्हाण (४३), नंदा शिंदे (६३), लक्ष्मण तलवारे (५०) आणि महादेवी तलवारे (४७) हे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले.

याप्रकरणी चाकण उत्तर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दगडे व पोलीस हवालदार शिरसाट करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!