शबनम न्यूज | प्रतिनिधी
सध्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर अत्यंत गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि वाढत्या गुन्हेगारीच्या दाहक वास्तवावर भाष्य करणारा ‘बीड फाइल्स’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. डॉ. डोईफोडे फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, संवेदनशील विषयावर परखड भाष्य करणारा चित्रपट म्हणून याकडे पाहिले जात आहे.
समाजात घडणाऱ्या गुन्हेगारी घटना, त्यामागील व्यवस्थात्मक त्रुटी आणि सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेले असुरक्षिततेचे वातावरण यावर हा चित्रपट थेट प्रकाश टाकणार आहे. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजातील वास्तववादी प्रश्नांची मांडणी करणे हा या कलाकृतीचा मुख्य उद्देश आहे.
‘बीड फाइल्स’ हा चित्रपट बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि गुन्हेगारी वास्तवाचा वेध घेताना गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या परिस्थितीपासून ते सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेपर्यंतच्या अनेक प्रश्नांना अधोरेखित करणार आहे. नुकतच चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. समोर आलेल्या पोस्टरमध्ये समाजासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर प्रश्नांचे वास्तववादी चित्रण करण्यावर भर दिला असल्याचं दिसतंय.
या चित्रपटाचे निर्माता डॉ. शशिकांत डोईफोडे, सह-निर्माता शिवराज बांगर असून दिग्दर्शन गणेश शिंदे करणार आहेत. या आशयघन चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे.





Total Users : 214884