शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे–लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन काम पूर्ण होण्याची निश्चित कालमर्यादा स्पष्ट करावी. तळेगाव, पिंपरी, देहूरोड आणि चिंचवड या प्रमुख स्थानकांवर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देणे तसेच अतिरिक्त आरक्षित डब्यांची सुविधा उपलब्ध करावी. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, तळेगाव आणि लोणावळा स्थानकांवरील कामांमध्ये आवश्यक सुधारणा करून ती तत्काळ पूर्ण करण्याची सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची आढावा बैठक पार पडली. पुणे, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर विभागातील रेल्वे प्रवाशांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता आणि प्रलंबित प्रश्नांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार बजरंग सोनवणे, विशाल पाटील, डॉ. अमोल कोल्हे, भास्कर भगरे, मेधा कुलकर्णी, ज्योती वाघमारे, बालाजी काळगे, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, उपमहाव्यवस्थापक कृष्ण किशोर मिश्रा, पुणे रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक प्रभात कुमार, प्रधान मुख्य अभियंता रजनीश माथुर, मुख्य प्रशासकीय अधिकारी भुवनेश कुमार गुप्ता तसेच रेल्वे विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, कामशेत एलजी गेट क्रमांक ४२ येथील सबवेमध्ये पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आरओबी अथवा योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करावेत. मळवली एलजी गेट क्रमांक ३२ येथील प्रलंबित आरओबीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून पर्यायी रस्त्याची दुरुस्ती करावी. केशवनगर–वडगाव गेट क्रमांक ४९ जवळील अंडरपास सुरू करावा. जांभुळवाडी येथील अंडरपासजवळील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे व पाणी साचण्याची समस्या दूर करत काम पूर्ण करावे. पुण्याकडून येणाऱ्या महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये गर्दीमुळे पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना चढण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने आवश्यक अतिरिक्त सुविधा व व्यवस्था उपलब्ध कराव्यात.
प्रगती, महालक्ष्मी, चेन्नई एक्स्प्रेसला थांबा द्यावा
फुगेवाडी येथील सुरू असलेल्या पुश पुलाच्या कामामुळे स्मशानभूमी व दफनभूमीकडे जाणारा पूर्वीचा मार्ग आरटीओशी समन्वय साधून लवकरात लवकर पुन्हा सुरू करणे तसेच काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांसाठी पायी जाण्याचा मार्ग सुरू ठेवण्यात यावा. प्रगती एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि चेन्नई एक्स्प्रेसला चिंचवड रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा.
पुणे–लोणावळा मार्गावर प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन दुपारच्या वेळेत अतिरिक्त लोकल सुरू करावी. कोविड काळात बंद करण्यात आलेले रेल्वे गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत.
सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत सुरू करावी आणि बारामती–कर्जत पॅसेंजर पूर्ववत सुरू करण्याची सूचना खासदार बारणे यांनी केली.





Total Users : 214749