पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
तळेगाव : वराळे फाटा परिसरात विनापरवाना एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडे हा कट्टा ठेवण्यासाठी दिल्याच्या आरोपावरून अजय भीमराव जाधव (वय २५, रा. धामणे, ता. खेड) याच्याविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
ही घटना १८ ऑगस्ट रोजी रात्री ९.०५ वाजण्याच्या सुमारास वराळे फाटा ते वराळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वामी मेडिकलसमोर, ता. मावळ येथे घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अजय जाधव याने आणलेला एक देशी बनावटीचा लोखंडी गावठी कट्टा विधी संघर्षित बालकाकडे ठेवण्यासाठी दिला होता. हा कट्टा त्याच्या ताब्यात आढळून आला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आदेशानुसार ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेपासून १८ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) अन्वये मनाई आदेश लागू होता. या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी सपोफौ अनंत देवेंद्र रावण यांच्या फिर्यादीवरून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात १८ ऑगस्ट रोजी रात्री ११.१८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१), (३) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.





Total Users : 214678