पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी : भांबोली गावच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दमदाटी करत धारदार कोयते बाळगणाऱ्या दोघांना उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विनापरवाना हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई १७ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १२.२० वाजता भांबोली गावच्या हद्दीतील कमानीजवळ करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत बाळू रोकडे (वय २६, रा. स्मशानभूमीजवळ, भांबोली) आणि राज बंडे (वय अंदाजे ३०, रा. भांबोली) हे दोघे संशयास्पदरीत्या आढळून आले.
आरोपींकडे धारदार कोयते असून, गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना हत्यारे बाळगल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच रस्त्याने जाणाऱ्या रोहित राजू सातपुते (वय २६) आणि विजय मनोजकुमार कांबळे (वय २२) यांना दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातील मारुती कंपनीची ईको कार (क्रमांक एमएच १४ केए ६१७९) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब त्र्यंबक भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात १८ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)/१३५ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३), ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढोले करीत आहेत.





Total Users : 214678