पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, बनावट कागदपत्रे दाखवत अटकेची धमकी देऊन ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना पिंपळे गुरव येथे उघडकीस आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दि. २ ते ६ ऑगस्टदरम्यान आरोपींनी फिर्यादी विष्णू महादेव घारे (वय ७१) यांच्याशी संपर्क साधला. आरोपींनी पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सर्वोच्च न्यायालय व इतर यंत्रणांच्या नावाने बनावट पत्रे पाठवली. घारे यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी झाल्याचे तसेच त्यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग व राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर गुन्हे दाखल असल्याचे सांगितले.
तसेच अटक करण्याची व मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्याची धमकी देत आरोपींनी घारे यांना कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यात चेकद्वारे १५ लाख रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१९(२), ३३६, ३३७, ३४०, ३४२(१), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल क्रमांक व बँक खात्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.




Total Users : 226350