spot_img
spot_img
spot_img

बालाजीनगरमधील नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना; नगरसेवक तुषार सहाणे यांचा पाहणी दौरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बालाजीनगर परिसरातील विविध नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तुषार भिवाजी सहाणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी नगरसेवक सहाणे यांनी स्वतः पुढाकार घेतल्याने परिसरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे तसेच जलनि:सारण विभागाचे अधिकारी श्री. ललित हेडाऊ उपस्थित होते. यावेळी परिसरातील रस्ते, जलनि:सारण व्यवस्था, पावसाळी पाण्याचा निचरा तसेच इतर आवश्यक नागरी सुविधांबाबत नागरिकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देण्यात आली. तसेच संबंधित ठेकेदारांशी चर्चा करून प्रलंबित कामे तातडीने सुरू करण्याच्या आणि सुरू असलेली कामे दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना नगरसेवक तुषार सहाणे यांनी दिल्या.

नागरिकांना वारंवार नागरी समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करण्यावर भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जलनि:सारणाशी संबंधित अडचणी, रस्त्यांची अवस्था आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देशही संबंधित विभागाला देण्यात आले.

“नागरिकांच्या समस्या माझ्यासाठी प्राधान्याच्या आहेत. समस्या कागदावर किंवा कार्यालयात बसून समजून घेण्यापेक्षा प्रत्यक्ष परिसरात जाऊन पाहणी करून त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. संबंधित विभागांच्या समन्वयातून बालाजीनगरमधील प्रलंबित नागरी कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल,” अशी भूमिका नगरसेवक तुषार भिवाजी सहाणे यांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळातही प्रभागातील नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!