पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
मनी ट्रान्सफरसाठी जात असलेल्या तरुणाला कारमध्ये बसवून काही अंतरावर नेल्यानंतर त्याच्याकडील मोबाईल व रोकड असा मुद्देमाल हिसकावून नेल्याची घटना चिखलीतील जाधववाडी परिसरात घडली. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंजनकुमार नंदकिशोर राजभर (वय २५) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पांडुरंग क्षीरसागर (वय २७), सुहास ऊर्फ डेव्हीड आणि पप्पू चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी मनी ट्रान्सफरसाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना कारमध्ये बसण्यास सांगितले. काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला खाली उतरवून त्याच्याकडील ओपो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल आणि २० हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.
मोबाईलमध्ये दोन आयएमईआय क्रमांक असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी बी.एन.एस. कलम ३०४(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पुढील तपास सपोनि मोटे व पोहवा काळोखे करीत आहेत.





Total Users : 214193