पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
वैद्यकीय पदवी अथवा आवश्यक शैक्षणिक पात्रता नसतानाही औषधे व इंजेक्शन देत रुग्णांवर उपचार करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरला रावेत पोलिसांनी अटक केली. भागवत टेटकुराम निषाद (वय ३९) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील पांढरे वस्ती परिसरात श्रीनाथ हॉस्पिटलजवळ आरोपी बेकायदेशीरपणे रुग्णांची तपासणी करून औषधे व इंजेक्शन देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन कारवाई केली.
आरोपीकडे कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा आवश्यक पात्रता नसताना तो वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच रुग्णांना औषधोपचार करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मनोहर मोरे (वय ४७) यांच्या फिर्यादीवरून रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ३१९(२) तसेच वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ मधील कलम ३३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि देशमुख व पोउपनि खिळे करीत आहेत.





Total Users : 214173