शबनम न्यूज | प्रतिनिधी
दुर्गम आणि ग्रामीण भागात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवत संस्कारक्षम पिढी घडविणाऱ्या शिक्षकांसाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि मावळ शिक्षक प्रबोधन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ‘नाट्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले.
अहोरात्र शैक्षणिक तसेच विविध प्रशासकीय कामांमध्ये व्यग्र असलेल्या शिक्षकांना दैनंदिन ताणतणावातून काही काळ विरंगुळा मिळावा, निखळ मनोरंजनाचा आनंद घेता यावा आणि दर्जेदार मराठी नाट्यकलेचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने ‘एकदा पाहावं करून’ या तुफानी विनोदी नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याला प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे आकर्षण वाढले. प्रयोगापूर्वी तसेच प्रयोगादरम्यान शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. शिक्षकांनी केवळ प्रेक्षक म्हणून नाटकाचा आनंद घेत हास्य-विनोदाच्या माध्यमातून आपला ताणतणाव दूर करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
ग्रामीण व दुर्गम भागातील रसिकांपर्यंत नाट्यकला पोहोचविण्यासोबतच शिक्षकांना कलास्वाद घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.
यावेळी मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी शिक्षकांच्या सहभागाचे कौतुक केले. “हास्याची मेजवानी आणि दर्जेदार नाट्यस्वादाचा आनंद घेणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे मावळच्या दुर्गम भागातील शिक्षकांना नाट्यकलेचा आनंद घेत काही क्षण तणावमुक्त आणि आनंदी वातावरणात घालवता आले. शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या नाट्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.





Total Users : 214173