spot_img
spot_img
spot_img

‘महाराष्ट्राचे दादा, अजित दादा’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘महाराष्ट्राचे दादा अजित दादा’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शबनम न्यूज मीडिया ग्रुप प्रस्तुत आणि लेखिका गजाला सय्यद लिखित या पुस्तकातून अजितदादा पवार यांच्या संघर्षमय जीवनप्रवासासह त्यांचे नेतृत्व, सामाजिक कार्य, राजकीय कारकीर्द आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

या प्रकाशन सोहळ्याला शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संपादिका शबनम सय्यद, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच पुस्तकाच्या लेखिका गजाला सय्यद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘महाराष्ट्राचे दादा अजित दादा’ या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल शबनम न्यूज मीडिया ग्रुप आणि लेखिका गजाला सय्यद यांचे कौतुक केले. अजितदादांच्या कार्याचा आणि त्यांच्या जीवनप्रवासाचा लेखाजोखा पुस्तकाच्या माध्यमातून जतन करण्याचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

सदर पुस्तकामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज पदाधिकारी व नेते यांच्या अनुभवांना त्यांच्या स्वतःच्या शब्दांत अधोरेखित करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत अजितदादा पवार यांनी शहरात अनेक सक्षम नेते आणि कार्यकर्ते घडविले. या नेत्यांच्या आठवणी, अनुभव आणि अजितदादांविषयीच्या भावना त्यांच्या शब्दांतून या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.

महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला अजितदादा पवार यांनी कशा पद्धतीने दिशा दिली, विविध विकासकामांच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीचे नवे पर्व कसे सुरू केले आणि शहरातील राजकीय व सामाजिक नेतृत्व घडविण्यात त्यांची भूमिका काय होती, याची सविस्तर माहिती या पुस्तकात मांडण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वाचा आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासातील त्यांच्या योगदानाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारे हे पुस्तक ठरणार आहे.

‘महाराष्ट्राचे दादा अजित दादा’ या पुस्तकाच्या माध्यमातून अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू वाचकांसमोर येणार असून, त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी प्रवास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर पुस्तक उपलब्ध करण्यात आले असून इच्छुकांनी 9657409579 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!