शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लेट्स हेल्प फाउंडेशनच्या वतीने बिजलीनगर, चिंचवड येथील विरंगुळा केंद्रात नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि भव्य प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये नागरिकांची डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर) यांसह विविध प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तसेच तज्ज्ञांकडून नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे एकाच ठिकाणी विविध आरोग्य तपासण्यांची सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला.

रक्तदान शिबिरातही नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत रक्तदान केले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास लेट्स हेल्प फाउंडेशनच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबिराचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ, बिजलीनगर यांच्या वतीने सहभागी झालेले गोपाल शर्मा. त्यांनी आतापर्यंत तब्बल ६५ वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.
स्वातंत्र्यदिन केवळ देशभक्ती व्यक्त करण्याचा दिवस न राहता समाजाच्या आरोग्याची आणि गरजूंना मदत करण्याची भावना रुजविणारा ठरावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता लेट्स हेल्प फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाला मोठे यश मिळाले.
आरोग्य तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन आणि रक्तदानाच्या माध्यमातून ‘निरोगी समाज आणि सामाजिक बांधिलकी’चा संदेश देणारे हे शिबिर परिसरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरले.





Total Users : 213470