शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्पाईन रोडवरील संतनगर चौक, मोशी येथे टेम्पो चालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून बुलेटला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात बुलेटस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार संजीवनराव कोंगळे (वय २८, रा. भोसरी) हे दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वानऊच्या सुमारास मित्राच्या बुलेटवरून (एमएच १४ डीव्ही ०१४४) निघोजे येथे जात होते. ते स्पाईन रोडच्या सर्व्हिस लेनने संतनगर चौक येथे आले असता स्पाईन रोडवरून आलेल्या एमएच १४ बीजे ३५६५ क्रमांकाच्या टेम्पोने त्यांच्या बुलेटला धडक दिली.
आरोपी चालक पांडुरंग नामदेव डिगोळे (वय ३७, रा. शिक्रापूर) याने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो डावीकडे वळविल्याने बुलेटला टेम्पोच्या डाव्या बाजूने धडक बसली. यात कोंगळे जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. तसेच बुलेटचेही नुकसान झाले आहे.
याप्रकरणी दि. ९ ऑगस्ट रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(ब), ३२४(४), मोटार वाहन कायदा कलम ११९/१७७ तसेच संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोनापल्ले करीत आहेत.



