शबनम न्यूज | प्रतिनिधी
आळंदी : उसने दिलेल्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना आळंदी येथे घडली आहे. तिघा आरोपींनी संगनमत करून एका तरुणाला शिवीगाळ व दमदाटी करत लोखंडी खंजीरासारख्या धारदार शस्त्राने पोटावर, डोक्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची फिर्याद दाखल झाली आहे.
या प्रकरणी फिर्यादी सागर दत्ता बडे (वय २२, रा. देहू फाटा , पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास आळंदी येथील नगरपरिषद इमारतीसमोरील कमानीजवळ, पीएमटी चौक परिसरात ही घटना घडली. फिर्यादी सागर बडे यांची एमएच १२ एलएम ४६०३ क्रमांकाची ऑटो रिक्षा उभी असताना आरोपी तेथे आले. पैशांच्या व्यवहारावरून मनात राग धरून आरोपींनी फिर्यादी यांच्याशी वाद घातला. त्यानंतर तिघांनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी फिर्यादीच्या हातातील लोखंडी खंजीरासारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या पोटावर, डोक्यावर तसेच शरीरावर जोरदार वार केले. या हल्ल्यात सागर बडे गंभीर जखमी झाले. त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पिल्या ऊर्फ आर्यन नागोराव पंडित (वय २०, रा. आळंदी), नव्या ऊर्फ नवनाथ जाधव (वय १९, रा. इंद्रायणी नगर, चौवीसावाडी, ता. हवेली) आणि वैभ्या ऊर्फ वैभव व्यवहारें (वय २०, रा. केळगाव, ता. खेड; पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम १०९(१), ३५२, ३५१(२), ३(५), शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि फौजदारी कायदा सुधारणा अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.




Total Users : 239204