शबनम न्यूज | प्रतिनिधी
दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी करत भाजी विक्रेत्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण केल्याची घटना आळंदीतील वडगाव रोड परिसरात घडली. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांविरुद्ध खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ भीमराव डबडे (वय ६०, रा. वडगाव रोड, आळंदी) हे ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दि. ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हरिओम गणेश पांचाळ आणि त्याच्यासोबतचा एक अनोळखी व्यक्ती डबडे यांच्या भाजीपाला गाड्यावर आले.
दोघांनी डबडे यांच्याकडे दरमहा पाच हजार रुपये हप्ता म्हणून मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बाजूला पडलेल्या दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी दि. ९ ऑगस्ट रोजी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०८(३), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दुधमल करीत आहेत.



