spot_img
spot_img
spot_img
spot_img

चिखलीत भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; प्रशासनाविरोधात संताप, २४ तासांत कारवाई करा – भाऊसाहेब भोईर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक १ चिखली-म्हेत्रेवस्ती परिसरात ७ ते ८ भटक्या कुत्र्यांनी एका निष्पाप लहान मुलीवर हिंस्त्र हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे चिखली परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभागनिहाय विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. असे असतानाही प्रभाग क्रमांक १ मध्ये संबंधित यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे.

“अधिकाऱ्यांचे वेतन आणि प्रशासकीय खर्च जनतेच्या करातून होत असताना, कर्तव्यात कसूर होत असेल तर या निष्पाप बालिकेच्या झालेल्या गंभीर दुखापतीला आणि तिच्या कुटुंबाच्या मानसिक त्रासाला प्रशासन व संबंधित प्रभाग अधिकारी जबाबदार आहेत,” असा संताप भोईर यांनी व्यक्त केला.

तीन दिवसांत नसबंदी व लसीकरणाची मागणी

चिखली-म्हेत्रेवस्ती परिसरातील पिसाळलेल्या व हिंसक भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेचे विशेष पथक तैनात करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही भोईर यांनी केली आहे.

याशिवाय चिखली प्रभागात पुढील तीन दिवसांत युद्धपातळीवर भटक्या कुत्र्यांचे नसबंदीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवावी. या मोहिमेचा दैनंदिन अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

“२४ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन”

चिखली परिसरातील नागरिक आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन २४ तासांच्या आत ठोस कारवाई करावी, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.

“२४ तासांत ठोस कारवाई न झाल्यास परिसरातील संतप्त नागरिकांना सोबत घेऊन महापालिका मुख्य इमारतीसमोर तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!