शबनम न्यूज | प्रतिनिधी
सोन्याचा झुमका चोरी केल्याचा आरोप करून एका महिलेने तरुणाकडे ८५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याच्याकडून एक लाख रुपये घेतल्यानंतरही आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करत चोरीची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या कथित धमकी व मानसिक त्रासाला कंटाळून भोसरीतील २६ वर्षीय तरुणाने १२ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद पेमाराम चौधरी (वय २६) हा तरुण भोसरी येथील डिस्टीनेशन क्षितीज सोसायटीमध्ये राहत होता. २७ जुलै रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास एका सरोज नावाच्या महिलेने विनोद याच्यावर तिच्या कानातील सोन्याचा झुमका त्याच्या दुकानात पडल्याचा आरोप केला. झुमका परत न केल्यास चोरीची पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
महिलेने विनोदकडून एक लाख रुपये घेतल्यानंतरही आणखी ५५ हजार रुपयांची मागणी केली, तसेच त्याला धमकावण्यासाठी एका व्यक्तीलाही सोबत आणल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रासाला कंटाळून विनोदने सोसायटीच्या टेरेसवरून उडी मारून जीवन संपविल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८ व भादंवि कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




Total Users : 226404