शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी संगनमत करून घरात येत पती-पत्नीला मारहाण केल्याची घटना मेदनकरवाडी येथील बंगलावस्ती परिसरात घडली. याप्रकरणी दक्षिण चाकण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानिफनाथ जालीदर शिंदे (वय २६) हे पत्नी कोमल शिंदे यांच्यासह बंगलावस्ती, मेदनकरवाडी येथे राहत आहेत. ७ ऑगस्ट रोजी पहाटे सव्वाचारच्या सुमारास प्रज्ञा प्रविण तापकिर (वय २२), प्रविण शहाजी तापकिर (वय ३५) आणि सारिका बाळासाहेब उगले (वय ४५) हे तिघे शिंदे यांच्या घरी आले.
प्रज्ञा हिला दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून आरोपी चिडले. त्यानंतर सारिका उगले हिने शिंदे यांच्या पत्नीची गचांडी धरून चपलेने मारहाण केल्याचा आरोप आहे. तर प्रज्ञा हिने केबलने कानिफनाथ शिंदे यांच्या दोन्ही हातांवर, पायांवर, मांडीवर, कंबरेवर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



