शबनम न्यूज | प्रतिनिधी
रॉंग साईडने भरधाव कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गहुंजे गावच्या हद्दीत सैनिक स्कूलजवळ शिरगाव-गहुंजे रस्त्यावर घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक सुनील शर्मा (वय १७) हा हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकीवरून गहुंजेकडून शिरगावच्या दिशेने जात होता. त्यावेळी तुळशीराम गोविंदराव मुलूकपाडे (वय २९) हा स्विफ्ट डिझायर कार घेऊन शिरगावकडून गहुंजेकडे जात होता.
आरोपीने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणे रॉंग साईडने कार चालवून अभिषेकच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. या अपघातात अभिषेकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात कारचालक तुळशीराम मुलूकपाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



