शबनम न्यूज | प्रतिनिधी
भोसरी गावठाणातील संत ज्ञानेश्वर भाजी मंडई इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गाळ्यात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर भोसरी पोलिसांनी छापा टाकून सात जणांवर कारवाई केली. या कारवाईत जुगार साहित्य आणि रोख रकमेसह एकूण ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास संत ज्ञानेश्वर भाजी मंडई इमारतीतील गाळा क्रमांक ११२ येथे आरोपी बालाजी संगमे, अशोक बनसोडे, प्रकाश लोंढे, किशोर शाहू, देवातेजो पंडीत, बिरेंदर साहू आणि योगेश नागरगोजे हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच क्लबचालकाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींना बेकायदेशीररीत्या जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.



