शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातील विविध रुग्णालयांसमोरील रस्त्यांवर लावण्यात आलेले ‘नो पार्किंग’ फलक, त्यामागील वाहतूक नियमनाची आवश्यकता आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली वाहनतळ व्यवस्था यांचा प्रशासनाने फेरआढावा घ्यावा. तसेच उपचार, आपत्कालीन सेवा किंवा गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर परिस्थितीचा विचार न करता करण्यात येणारी दंडात्मक कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते तथा युवासेना पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी वाहतूक विभागाचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांची भेट घेऊन निवेदन साद केले.
निवेदनात म्हटले आहे की, रुग्णालयात येणारे नागरिक हे पर्यटन किंवा अनावश्यक कारणासाठी येत नसून उपचार, वैद्यकीय तपासणी, आपत्कालीन सेवा अथवा गंभीर रुग्णाला तातडीने दाखल करण्यासाठी येत असतात. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला कमीत कमी वेळेत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे असते.
मात्र, अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी वाहनतळ व्यवस्था उपलब्ध नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णाला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी किंवा रुग्णाला घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकांना काही काळासाठी रस्त्याच्या कडेला वाहन उभे करण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत ‘नो पार्किंग’ नियमाचा आधार घेत तातडीने दंडात्मक कारवाई किंवा वाहन उचलण्याची कारवाई झाल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनावश्यक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो.
रुग्णालयांना आवश्यक वाहनतळ व्यवस्था उपलब्ध करून देणे ही संबंधित प्राधिकरणांच्या नियमांनुसार महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे ज्या रुग्णालयांमध्ये वाहनतळाची व्यवस्था अपुरी आहे किंवा प्रत्यक्षात उपलब्ध नाही, अशा ठिकाणी प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी करून संबंधित रुग्णालयांवर आवश्यक ती कार्यवाही करावी. केवळ रुग्णांच्या नातेवाईकांवर दंडात्मक कारवाई करून वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न सुटणार नाही, असे बेंद्रे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
तसेच, रुग्णालयांसमोरील ‘नो पार्किंग’ क्षेत्र निश्चित करताना रुग्णवाहिका, रुग्णांना उतरविणे-चढविणे, आपत्कालीन प्रवेश आणि अल्पकालीन वाहन थांबविण्याची आवश्यकता यांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
रुग्णांच्या हिताचा विचार करून शहरातील रुग्णालयांसमोरील ‘नो पार्किंग’ व्यवस्था, फलकांची आवश्यकता आणि उपलब्ध पार्किंग सुविधांचा संयुक्तपणे फेरआढावा घ्यावा, तसेच वैद्यकीय कारणांसाठी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक त्रास होणार नाही, यासाठी वाहतूक विभागाने योग्य मार्गदर्शक सूचना व कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी चेतन गौतम बेंद्रे यांनी केली.
“वाहतूक शिस्त आणि रुग्णांच्या अडचणी यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. नियम हे नागरिकांच्या सोयीसाठी असावेत; मात्र आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे बेंद्रे यांनी यावेळी सांगितले.



