चाकण | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
चाकण एमआयडीसीतील कंपनीत क्रेनद्वारे लोखंडी अँगल हलविताना अचानक झटका बसल्याने अँगल खाली काम करणाऱ्या कामगाराच्या अंगावर पडला. या दुर्घटनेत २६ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय मदनलाल (वय २६) हा कामगार एस.के.एस. फास्टनर्स लिमिटेड कंपनीत काम करीत होता. कंपनीच्या शॉप फ्लोअर विभागात दिलीपकुमार सिताराम चौधरी (वय ३२) हा हायड्रोलिक क्रेन चालवत होता.
२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने लोखंडी अँगल उचलून खाली घेत असताना क्रेनला अचानक झटका बसला. त्यामुळे अँगलचा तोल जाऊन बाजूच्या लोखंडी अँगलला धक्का बसला. त्यानंतर लोखंडी अँगल खाली पायी जात असलेल्या अजय मदनलाल यांच्या अंगावर पडला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.
क्रेन स्वतःच्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने निष्काळजीपणे व हयगयीने चालवल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अन्वये क्रेन ऑपरेटर दिलीपकुमार चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. बुरुड करीत आहेत.



