चिखली | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
चिखली परिसरात एमडी (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी वाहतूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत ८.७३ ग्रॅम एमडीसह एकूण ७ लाख ३८ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास हरगुडे वस्ती ते स्पाईन रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पत्र्याच्या शेडजवळ ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी समशुद राजाबली शहा (२३), साहबन मोहम्मद इलियास शहा (२१), सोहेल कादिर शेख (२९) आणि अभिराज जोखुराम कोरी (३३) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून ८ ग्रॅम ७३ मिलीग्रॅम एमडी (मेफेड्रॉन), एक चारचाकी, एक दुचाकी, चार मोबाईल फोन आणि ९२० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपींनी हा एमडी मुंबईतील हर्ष यादव उर्फ ‘केडीसी’ याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुरवठादाराचाही शोध सुरू आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. देवकर करीत आहेत.



