शबनम न्यूज | प्रतिनिधी
ऑल सेंट्स हायस्कूलमधील इयत्ता पहिली, दुसरी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी ४ ऑगस्ट रोजी शैक्षणिक भेटीअंतर्गत पुणे येथील जनरल पोस्ट ऑफिसला (GPO) भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी टपाल विभागाच्या दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
विद्यार्थ्यांना पत्रे आणि पार्सल यांची छाननी, शिक्कामोर्तब तसेच वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. तसेच स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, मनी ऑर्डर आणि पोस्टल सेव्हिंग्ज यांसारख्या विविध टपाल सेवांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
भारत पोस्टच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना जोडण्याचे महत्त्वाचे कार्य कसे केले जाते, याची माहिती विद्यार्थ्यांना या भेटीतून मिळाली. तसेच टपाल सेवांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झाल्याने कार्यप्रणालीत झालेल्या सुधारणांचीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर प्रत्यक्ष अनुभवातून नवीन ज्ञान मिळाले. पोस्टमास्तर श्री. अमेय निमसुडकर आणि त्यांचे सहकारी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.
या उपक्रमाचे ऑल सेंट्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. मिसेस जेस्सी जयसिंग आणि उपमुख्याध्यापिका श्रीमती मरियम्मा बॉबी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना या शैक्षणिक भेटीचा लाभ मिळावा यासाठी संबंधित वर्गातील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.



