पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सहायक पोलीस आयुक्त, सांगवी विभाग कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी (दि. ६ ऑगस्ट २०२६) उत्साहात पार पडला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी सांगवी विभागातील अधिकारी व अंमलदारांना शुभेच्छा देत, नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने पोलीस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्षमतेने व समर्पित भावनेने काम करण्याचे निर्देश दिले.
नवीन कार्यालयातील आधुनिक सुविधा, सुबक कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यप्रणालीमुळे नागरिकाभिमुख पोलीस सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उद्घाटन सोहळ्यास पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त संदीप आटोळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे शाखा) रोहिदास पवार, पोलीस उपआयुक्त प्रदीप जाधव, पोलीस उपआयुक्त मारुती जगताप, पोलीस उपआयुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग प्रशांत ढोले, सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनिषा कदम यांच्यासह परिमंडळ-१ मधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सांगवी विभागातील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन कार्यालयामुळे सांगवी विभागातील नागरिकांना पोलीस प्रशासनाशी संबंधित कामकाजासाठी अधिक सुलभ आणि प्रभावी सेवा मिळण्यास मदत होणार आहे.



