शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून, पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या विद्यमान युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे यांच्या जागी आता निर्मला नवले यांच्याकडे ही महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
देवगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते निर्मला नवले यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. निर्मला नवले यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावचे सरपंचपद भूषवले आहे. स्थानिक पातळीवर, विशेषतः ग्रामीण भागात त्यांनी तरुण आणि महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची आणि पक्ष संघटनेतील सक्रियतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर युवती प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
या नवीन नियुक्तीमुळे पक्षाच्या युवती आघाडीला अधिक ऊर्जा मिळेल आणि आगामी काळात राज्यातील तरुणींचे प्रश्न आक्रमकपणे मांडले जातील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कारेगावमधील उल्लेखनीय काम आणि दांडगा जनसंपर्क पाहून दिवंगत नेते अजित पवार यांनी निर्मला नवले यांच्यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील युवतींशी थेट संवाद साधून संघटन मजबूत केले. आता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण राज्यातील युवतींचे सक्षम संघटन उभारणे आणि नव्या महिला नेतृत्वाला संधी देण्याची मुख्य जबाबदारी आली आहे.



