सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांची आयुक्तांकडे मागणी
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळण्यात होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) माध्यमातून रक्कम तातडीने जमा करण्याची मागणी केली आहे.
कोल्हटकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आले तरी महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य उपलब्ध झालेले नाही. ठेकेदारामार्फत साहित्य खरेदी व वितरण करण्याच्या प्रक्रियेत मतभेद आणि विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, विद्यार्थ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीसमोर मांडला होता. मात्र, हा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्याचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा ठेकेदारी व्यवस्थेला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या निर्णयाचा त्यांनी तीव्र निषेधही व्यक्त केला आहे.
राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त विजय सूर्यवंशी यांना राज्य सरकारच्या आदेशानुसार आणि आपल्या प्रशासकीय अधिकारांचा वापर करून शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या खात्यावर DBT पद्धतीने शालेय साहित्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. पुणे महानगरपालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेतही ही पद्धत तातडीने लागू करावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनाची प्रत महापौर रवी लांडगे तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.



