spot_img
spot_img
spot_img
spot_img

कंपनीचा गोपनीय डेटा चोरून स्पर्धकाला पुरवल्याचा आरोप; तीन माजी कर्मचाऱ्यांवर सायबर गुन्हा

प्रतिनिधी | युनूस खतीब

कंपनीने विश्वासाने दिलेल्या अॅक्सेसचा गैरफायदा घेत संरक्षित व गोपनीय माहिती अनधिकृतपणे कॉपी करून ती स्पर्धक कंपनीच्या फायद्यासाठी वापरल्याच्या आरोपावरून तीन जणांविरोधात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अभिषेक सत्यनारायण शर्मा (रा. तळेगाव दाभाडे), प्रशांत नरेंद्र चव्हाण (वय ३२, रा. मोशी) आणि ध्यानेश संजय देसले (वय ३०, रा. खराबवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी व्यंकटा सुदर्शन चिलकलापल्ली (वय ३९, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडे युनिथर्म इंजिनियर्स कंपनीने विश्वासाने सोपविलेल्या जबाबदाऱ्या आणि संगणकीय अॅक्सेसचा गैरफायदा घेण्यात आला. कंपनीची संरक्षित व गोपनीय माहिती विनापरवानगी कॉपी करून ती स्वतःकडे तसेच इतरांकडे ट्रान्सफर करण्यात आली. त्यानंतर माहितीमध्ये छेडछाड करून काही डेटा डिलीट केल्याचाही आरोप आहे.

आरोपींनी कंपनीतील नोकरी सोडल्यानंतर स्पर्धक कंपनीत प्रवेश केला आणि या गोपनीय माहितीचा वापर करून ग्राहकांना कंपनीच्या उत्पादनांच्या किमती कमी करण्यास भाग पाडले तसेच काही ग्राहकांचा व्यवसाय स्पर्धक कंपनीकडे वळवून आर्थिक नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांनुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाळे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!