प्रतिनिधी | युनूस खतीब
निगडीतील यमुनानगर परिसरात भरधाव फोर्स ट्रॅव्हलरने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता निघून गेल्याचा आरोप असून, निगडी पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
श्रद्धा राजाराम माने (वय २५) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे काका दिपक हनमंत माने (वय ३९, रा. रावेत) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुनिल प्रकाश कवटेकर (वय ३२, रा. कडवाडी, ता. पाटण, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास श्रद्धा या पवळे ब्रिज, निगडी येथून यमुनानगरकडे कंपनीत कामासाठी मोपेडवरून जात होत्या. यमुनानगरमधील आशिष हाऊसिंग सोसायटीसमोरील रस्त्यावर पाठीमागून आलेल्या फोर्स ट्रॅव्हलरने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या अपघातात श्रद्धा गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅव्हलर चालक घटनास्थळी न थांबता निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिंगारदिवे करीत आहेत.



