प्रतिनिधी | युनूस खतीब
तळवडे गावठाण परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगल्याच्या आरोपावरून एका ४६ वर्षीय महिलेवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. तिच्या ताब्यातून १८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, देहूरोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द्वारका विलास चव्हाण (वय ४६, रा. चव्हाणनगर, तळवडे, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई रणधीर रमेश माने यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मराठी शाळेजवळ, भैरवनाथ सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या चव्हाण बंधू निवास परिसरात ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी महिलेच्या ताब्यात सुमारे ९ हजार रुपये किमतीचा १८० ग्रॅम गांजा आढळून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हा गांजा विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.



