शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखा-२ कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून, कार्यालयीन कार्यक्षमता आणि व्यावसायिकता वाढविण्याच्या दृष्टीने अधिकारी व अंमलदारांच्या कार्यालयीन पोशाखातही बदल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेश व मार्गदर्शनानुसार विशेष शाखा-२ कार्यालयाला आधुनिक स्वरूप देण्यात आले आहे. त्यासोबतच कार्यालयात कार्यरत पोलिसांसाठी स्वतंत्र ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांसाठी पांढरा शर्ट व काळी पँट, तर पोलीस अंमलदारांसाठी फिकट निळा शर्ट, ग्रे पँट आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा लोगो असलेला कोट असा नवा कार्यालयीन पोशाख असेल. या बदलामुळे कार्यालयीन शिस्त, एकसमानता आणि व्यावसायिकता अधिक ठळक होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन ४ ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त चौबे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व फीत कापून करण्यात आले. यावेळी त्यांनी विशेष शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांना शुभेच्छा दिल्या.
“नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्षमतेने व समर्पित भावनेने काम करावे,” अशा सूचना चौबे यांनी दिल्या. आधुनिक सुविधा, सुबक कार्यालयीन वातावरण आणि अद्ययावत कार्यपद्धतीमुळे नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक विभाग) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) रोहिदास पवार, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) धीरज पाटील, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) गणेश इंगळे, सहायक पोलीस आयुक्त (विशेष शाखा) सुनील पंधरकर, विशेष शाखा-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नरावाड तसेच परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.



