शबनम न्यूज | प्रतिनिधी
पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा भंग करून धारदार लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाविरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रहाटणी येथील गोडांबे चौकात करण्यात आली.
दिपक ज्ञानेश्वर जाधव (वय १९, रा. साई कॉलनी नं. १, नखातेवस्ती, रहाटणी, पुणे; मूळ रा. जि. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) प्रमाणे नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ३) पहाटे पाचच्या सुमारास गोडांबे चौक, रहाटणी येथे जाधव याच्याकडे सुमारे २०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला. गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याने हे प्राणघातक हत्यार जवळ बाळगल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शस्त्रे तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला होता. या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
पोलीस शिपाई रमेश रामनाथ खेडकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२१/२०२६ अन्वये आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नलावडे करीत आहेत.



