शबनम न्यूज | प्रतिनिधी
जाधववाडी परिसरात बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी १८ वर्षीय तरुणाला अटक केली असून, त्याच्यासोबत असलेल्या १६ वर्षीय विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र व काडतुसे जप्त केली आहेत.
गुरुराज देविदास फंड (वय १८, रा. आंबेडकर वसाहत, परिहार चौक, औंध, पुणे; मूळ रा. वरुडे, रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेला १६ वर्षीय मुलगा विधीसंघर्षित बालक असल्याने त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ३) सायंकाळी सातच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथील रामायण मैदानाजवळ पाण्याच्या टाकीखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडे देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. या मुद्देमालाची एकूण किंमत ३१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २२ जुलै ते ४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपींनी त्याचा भंग करून अग्निशस्त्र बाळगल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार विनोद तानाजी व्होनामे यांनी फिर्याद दिली असून, चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१४/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.



