spot_img
spot_img
spot_img
spot_img

राजस्थानच्या नागरिकाची लाखाची सायबर फसवणूक; पिंपरीतील एटीएममधून रक्कम काढली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

राजस्थानमधील एका नागरिकाची सायबर फसवणूक करून त्याच्याकडून एक लाख ४५ रुपये बँक खात्यावर स्वीकारल्यानंतर ती रक्कम पिंपरीतील एटीएममधून रोख स्वरूपात काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात बीड जिल्ह्यातील एका खातेधारकासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.

पवन दादासाहेब येवले (रा. मांडवजाली, पोस्ट पाली, जि. बीड) आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रविण मार्कंडेय दासरी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील ईस्ट जयपूर शहरातील बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नागरिकाची सायबर माध्यमातून एक लाख ४५ रुपयांची फसवणूक झाली होती. यासंदर्भात राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर (NCCRP) तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणाच्या तपासात फसवणूक झालेली एक लाख ४५ रुपयांची रक्कम पवन येवले याच्या पंजाब नॅशनल बँकेतील खात्यावर जमा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ही रक्कम पिंपरी येथील ज्वेल्स ऑफ पिंपरी कमला परिसरातील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून रोख स्वरूपात काढण्यात आल्याचे तपासात समोर आले.

हा व्यवहार १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.४० ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपीने आपल्या साथीदारांशी संगनमत करून संघटित सायबर गुन्हेगारी करणाऱ्या गटाचा सदस्य म्हणून हा व्यवहार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

याप्रकरणी ३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १०.५२ वाजता पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३१७(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी अद्याप अटकेत नसून पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक बोबडे करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!