शबनम न्यूज | प्रतिनिधी
देशातील दोन नागरिकांची ऑनलाइन माध्यमातून तब्बल ५० लाख ९४ हजार ९८९ रुपयांची फसवणूक झालेल्या प्रकरणात वाकड येथील एका बँक खात्याचा वापर झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. संबंधित खात्यावर फसवणुकीच्या रकमेपैकी २८ हजार २८० रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अक्षय संजय तांबे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय संजय तांबे (रा. राज पॅलेस बिल्डिंग, कस्पटे वस्ती, छत्रपती चौक, गणेश मंदिराजवळ, वाकड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आर. बी. गोडांबे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका नावाने कोटक महिंद्रा बँकेत खाते उघडले होते. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांशी संगनमत करून या खात्याचा आर्थिक व्यवहारांसाठी वापर केल्याचा आरोप आहे.
सायबर फसवणुकीसंदर्भातील तपासादरम्यान देशातील दोन नागरिकांच्या तक्रारींमध्ये एकूण ५० लाख ९४ हजार ९८९ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले. या फसवणुकीच्या व्यवहारांशी संबंधित २८ हजार २८० रुपये आरोपीच्या बँक खात्यावर व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
ही बाब ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री ११ वाजण्याच्या कालावधीतील व्यवहारांशी संबंधित असून, तपासानंतर ३ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.५२ वाजता हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंढे करीत आहेत.



