spot_img
spot_img
spot_img
spot_img

१५० कोटींच्या सायबर फसवणुकीचे मोशी कनेक्शन; तरुणाला अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉडसह अन्य ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून तब्बल १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात आळंदी पोलिसांनी मोशीतील तरुणाला अटक केली आहे. सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या नऊ बँक खात्यांमध्ये सायबर फसवणुकीशी संबंधित तब्बल १ कोटी १५ लाख रुपये जमा झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

आळंदी पोलीस ठाण्यातील सायबर सेल ‘म्युल अकाउंट’ची माहिती तपासत असताना काळे याचे कॉसमॉस बँक, आळंदी येथील बचत खाते ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

तपासात काळे याने स्वतःच्या नावावर विविध बँकांमध्ये नऊ खाती उघडल्याचे तसेच सायबर फसवणुकीतून आलेली रक्कम या खात्यांमध्ये स्वीकारून ती एटीएम आणि चेकद्वारे काढल्याचे समोर आले. एनसीसीआरपी पोर्टलवरील माहितीनुसार या प्रकरणाशी देशभरातील ६५ नागरिकांच्या सुमारे १५० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा संबंध असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून काळे याला अटक करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, पैसे कोणाकडे पोहोचविण्यात आले आणि या टोळीचे नेटवर्क किती मोठे आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलिसांच्या पथकाने केली.

पोलिसांचा इशारा : नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला स्वतःचे बँक खाते किंवा सिमकार्ड वापरण्यास देऊ नये. अनोळखी व्यक्तीकडून ऑनलाइन पैसे स्वीकारून ते एटीएम अथवा चेकद्वारे रोख स्वरूपात काढून देऊ नयेत. अशी रक्कम सायबर फसवणुकीतील असण्याची शक्यता असून संबंधित खातेधारकही कायदेशीर अडचणीत येऊ शकतो, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!