spot_img
spot_img
spot_img
spot_img

दुचाकी-मोबाईल चोरणारी टोळी बावधन पोलिसांच्या जाळ्यात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बावधन, हिंजवडीसह परिसरात दुचाकी आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा बावधन पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एका विधीसंघर्षित बालकाचाही समावेश आहे. आरोपींकडून ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि २४ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

अनिल लहू जाधव (वय २०, रा. म्हाळुंगे-नांदे रोड), वसंत अंकुश जाधव (वय २५) आणि सुनील लहू जाधव (वय २५, दोघे रा. सुतारवाडी, ता. मुळशी) अशी आरोपींची नावे आहेत.

बावधन पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सारंग ठाकरे व तपास पथक म्हाळुंगे-नांदे रोडवर गस्त घालत असताना नंबरप्लेट नसलेल्या युनिकॉर्न दुचाकीवरून दोन जण संशयास्पदरीत्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

चौकशीत अनिल जाधव आणि विधीसंघर्षित बालकाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. अधिक तपास केला असता अनिलने साथीदारांच्या मदतीने बावधन आणि हिंजवडी परिसरात दुचाकी व मोबाईल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवून आरोपींकडून सात दुचाकी आणि २४ मोबाईल हस्तगत केले. या तपासातून बावधन पोलीस ठाण्यातील चार, हिंजवडीतील दोन आणि शिरगाव-परंदवडी पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण सात दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सारंग आवाड, पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार, उपनिरीक्षक सारंग ठाकरे व गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!