spot_img
spot_img
spot_img
spot_img

गरवारे पुलाखाली नदीपात्रात अडकलेल्या युवकाची अग्निशमन दलाकडून थरारक सुटका

शबनम न्यूज | प्रतिनिधी

गरवारे पुलाखाली नदीपात्रात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या २५ वर्षीय युवकाची पुणे अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसी बचावकार्य करत सुखरूप सुटका केली. या कामगिरीबद्दल उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जवानांचे कौतुक केले.

आज दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास गरवारे पुलाखाली एक युवक नदीपात्रात अडकला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर एरंडवणा अग्निशमन केंद्राचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचल्यावर जवानांना संबंधित युवक नदीच्या मध्यभागी पाण्याच्या वेगवान प्रवाहात एका खांबाला धरून उभा असल्याचे दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी कोणताही विलंब न करता पाण्यात उतरून लाईफ जॅकेट, लाईफ रिंग आणि दोरीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू केले.

अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतील युवकाला धीर देत जवान त्याच्यापर्यंत पोहोचले. त्याच्या कमरेला सुरक्षित दोरी बांधून आणि लाईफ जॅकेट परिधान करून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

सुटका करण्यात आलेल्या युवकाचे नाव सागर आगाव (वय २५, रा. कर्वेनगर) असे आहे. युवक सुरक्षित बाहेर येताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या धाडसी कामगिरीचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

या बचाव मोहिमेत चालक महेश पांगारकर तसेच जवान सचिन आयवळे, आशुतोष पिंगळे, सागर मुंढे, कमलेश माने, राहुल वाघमोडे आणि निलेश पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!