पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी युनूस खतीब
वाकड पोलिसांनी वाहनचोरीविरोधात मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १५ आणि इतर भागातील २ असे एकूण १७ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी ज्ञानेश्वर शंकरराव जैस्वाल (रा. आळंदी) याला अटक केली. कसून चौकशीत त्याच्याकडून गेल्या दोन वर्षांत विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या २३ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्यानंतर २ ऑगस्ट रोजी वेदप्रकाश मदनसिंग रावत (रा. ताथवडे) याच्याकडून चोरीची ॲक्टिव्हा आणि संतोष मोहन मांगीलवाड (रा. वेणूनगर, वाकड) याच्याकडून चोरीची ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आली.
या कारवाईत वाकड, आळंदी, उत्तर चाकण, चाकण, संत तुकारामनगर, शिक्रापूर (पुणे ग्रामीण) आणि माणगाव (रायगड) पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण १७ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
ही उल्लेखनीय कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने केली.




Total Users : 226785