शबनम न्यूज | प्रतिनिधी
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी निघोजे येथील एका गॅस रिपेअरिंग सेंटरवर कारवाई करत घरगुती गॅस सिलिंडरमधून लहान टाक्यांमध्ये बेकायदा व धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महिंद्रा कंपनीसमोरील सुभाषवाडी, निघोजे येथील ‘ओमकार गॅस रिपेरिंग सेंटर’ येथे छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी शिवराज विश्वनाथ शिवपुजे (वय ४१) हा कोणताही वैध परवाना नसताना चार मोठे घरगुती गॅस सिलिंडर आणि दोन लहान सिलिंडरच्या साहाय्याने नॉझलद्वारे गॅसचे रिफिलिंग करत असल्याचे निदर्शनास आले.
गर्दीच्या वस्तीमध्ये ज्वलनशील गॅसचे अशा धोकादायक पद्धतीने रिफिलिंग केल्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.



