spot_img
spot_img
spot_img

एमपीएससी पेपरफुटी, एमएचटी-सीईटी घोटाळा आणि टीईटी रद्दच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी, एमएचटी-सीईटी परीक्षेतील कथित घोटाळा, पर्सेंटाईल (नॉर्मलायझेशन) पद्धती रद्द करणे, सर्व ऑनलाइन परीक्षा बंद करून ऑफलाइन परीक्षा घेणे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडने आरोप केला की, राज्यात सातत्याने एमपीएससी, एमएचटी-सीईटी, नीट, औषध निर्माणशास्त्र आदी परीक्षांमध्ये पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या घटना घडत असून त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही संघटनेने केला.

निवेदनात एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच व्हायरल झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच एमएचटी-सीईटी परीक्षा प्रक्रियेत खाजगी संस्थांचा हस्तक्षेप थांबवून परीक्षा प्रक्रिया सरकारच्या नियंत्रणाखाली आणावी, अशी मागणीही करण्यात आली.

याशिवाय, शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आलेली टीईटी परीक्षा रद्द करावी, केजी ते पीजीपर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करावे, यूपीएससीला बगल देणारी लॅटरल एन्ट्री प्रक्रिया बंद करावी आणि एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत समाविष्ट करावा, अशा सहा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

संभाजी ब्रिगेडने इशारा दिला की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या हिताच्या या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास संघटनेला अधिक तीव्र आंदोलन छेडावे लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे उपनेते सतीश काळे, शहराध्यक्ष प्रवीण कदम, कार्याध्यक्ष वैभव जाधव, उपाध्यक्ष नारायण बिरादार, वैभव गजधने, कोषाध्यक्ष राजेश सातपुते, संघटक परशुराम रोडे, विवेक गायकवाड, शाम पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!