पिंपरी-चिंचवड : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना शासकीय योजनांद्वारे उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमातून गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना विविध शासकीय योजना, ट्रस्ट आणि धर्मादाय संस्थांमार्फत उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधी, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच विविध खासगी ट्रस्टच्या माध्यमातून हृदय, किडनी, कॅन्सर, मेंदू, अपघात, प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत केली जाणार आहे.
रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया, मार्गदर्शन आणि पाठपुरावा करण्याची जबाबदारी वैद्यकीय मदत कक्षाकडून पार पाडली जाणार आहे.
यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, हॉस्पिटलचे कोटेशन आणि वैद्यकीय अहवाल ही कागदपत्रे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे समन्वयक मा. श्री. निनाद संगीता म्हळारी टेमगिरे (पाटील) असून, गरजू रुग्णांनी अधिक माहितीसाठी 9623988940 किंवा 9850620404 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गरजू नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत, तसेच आर्थिक अडचणींमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, हा या वैद्यकीय मदत कक्षाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.



