spot_img
spot_img
spot_img
spot_img

बँक खात्याचा वापर करून ३५ नागरिकांना ५७ लाखांचा गंडा

 

आळंदीत सायबर फसवणुकीचे ‘मनी म्युल’ खाते उघडल्याचा संशय; दोघांविरोधात गुन्हा

पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : बँक खाते उघडून त्याचा कथित फसवणुकीच्या व्यवहारांसाठी वापर करत देशभरातील तब्बल ३५ नागरिकांची ५७ लाख ५० हजार ३६२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार आळंदी पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांत वर्ग करून चेक आणि एटीएमद्वारे काढल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

याप्रकरणी सचिन संजय काळे (वय २५, रा. चऱ्होली खुर्द) आणि ऋषिकेश शिवराज कदम (वय १९, रा. चऱ्होली खुर्द, मूळ रा. धाराशिव) यांच्याविरोधात आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन काळे याने आळंदी येथील लाला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत खाते उघडले होते. हे खाते उघडताना ऋषिकेश कदम हा साक्षीदार म्हणून उपस्थित होता. दोघांनी अन्य साथीदारांशी संगनमत करून या खात्याचा वापर केल्याचा आरोप आहे.

तपासात संबंधित खात्यावर देशातील ३५ नागरिकांची फसवणूक झालेली ५७ लाखांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे समोर आले. त्यानंतर ही रक्कम वेगवेगळ्या खात्यांत वळवून चेक तसेच एटीएमच्या माध्यमातून काढण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खडके करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!