काकाच्या रेशीम किड्यांवर कीटकनाशकाची फवारणी; एक लाखांचे नुकसान
पुतण्याविरोधात गुन्हा; प्रयोगशाळेच्या अहवालानंतर तक्रार
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : रेशीम कीटक संगोपन शेडमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून रेशीम किड्यांवर कीटकनाशकाची फवारणी करत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप पुतण्यावर करण्यात आला आहे. काळुस येथील टेमगिरेवाडीमध्ये हा प्रकार घडला असून चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी परशुराम सुदाम टेमगिरे (वय ६५, रा. टेमगिरेवाडी, काळुस, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचा पुतण्या तुषार बबन टेमगिरे (वय २५) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(५), ३२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी रात्री आठ ते दहाच्या दरम्यान आरोपीने फिर्यादी यांच्या रेशीम कीटक संगोपन शेडमध्ये अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर रेशीम किड्यांवर ‘सायपरमेथ्रीन’ कीटकनाशकाची फवारणी केल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकाराबाबत संशय आल्याने फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीच्या शेतातील फवारणी पंपातील नमुना घेतला होता. हा नमुना आणि शेडमध्ये फवारलेल्या औषधाचा नमुना भोसरी येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संशयाची खात्री झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.
याप्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.




Total Users : 226795