मॅगझीन, जिवंत काडतूसासह ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त; शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी : शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांनी मामुर्डी परिसरातून अटक केली. अरबाज उर्फ बिल्ला युसुफ खान (वय २४, रा. मामुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ही कारवाई शनिवारी (दि. १) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास साईनगर, मामुर्डी येथील मुरगन टेम्पलजवळ करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून मॅगझीनसह गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस, असा एकूण ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलीस शिपाई पंकज कैलास भदाणे यांनी फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २२ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक शस्त्रबंदी आदेश लागू आहे. असे असतानाही अरबाज खान हा बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगताना आढळून आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक वाव्हळे करीत आहेत.




Total Users : 226795